(पुणे / पिंपरी चिंचवड)
पिंपरी चिंचवड भागातील देहूरोड शहरात मंगळवारी (दि. २८ एप्रिल) रात्री धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या फायरिंगमध्ये रमेश रेड्डी (रा. देहूरोड) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ८.३० वाजता हॉटेलजवळ उभ्या असताना अज्ञातांनी रमेश रेड्डी यांच्यावर अचानक गोळीबार केला. हल्लेखोरांनी तब्बल ९ राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एक गोळी त्यांच्या डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी Yashwantrao Chavan Memorial Hospital येथे हलवण्यात आला.
भावाचाही याच पद्धतीने खून
मृत रमेश रेड्डी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते. विशेष म्हणजे, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या भावाचा विक्रम गुरुस्वामी रेड्डी याचाही गोळ्या घालून खून झाला होता. त्यामुळे या घटनेमागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
परिसरात तणाव, रास्ता रोकोचा प्रयत्न
घटनेची माहिती समजताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठा आक्रोश व्यक्त केला. काही काळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत नागरिकांची समजूत काढली. संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून शहरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू आहे. देहूरोड बाजारपेठेतील अनेक दुकाने या घटनेनंतर बंद ठेवण्यात आली असून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हत्येमागील कारणांचा सखोल तपास केला जात आहे.

