(रत्नागिरी / प्रतिनिधी)
‘सीआरपीएफ’ वा ‘आर्मी’मध्ये अधिकारी असल्याचे भासवून फर्निचर स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवत रत्नागिरीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट आणि व्हॉट्सअपचा वापर करून तब्बल ३ लाख ३१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाअंती राजस्थानमधील दोन तरुणांना अटक केली आहे.
या प्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ०४/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपास आणि खबऱ्यांची साथ महत्त्वाची ठरली
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी बँक व्यवहारांचे बारकाईने विश्लेषण करत आरोपींचा माग काढला. तांत्रिक साधनांचा वापर आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने दिनेश कुमार मीना आणि राकेश कुमार मीना, हे दोघेही भचुंडला, अचनेरा, डालोत, प्रतापगढ (राजस्थान) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. मोबाईल लोकेशन उपलब्ध नसतानाही सायबर पथकाने कौशल्याने तपास करत आरोपींना ताब्यात घेतले. न्यायालयाकडून चार दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.
कारवाईचे सुत्रधार : सायबर पोलीस पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी आणि अपरे पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोनि. स्मिता सुतार, सपोनि. नितीन पुरळकर, पोहवा रामचंद्र वडार, विनोद कदम, आणि पोशि. अजिंक्य ढमढेरे यांनी केली.
“सीआरपीएफ किंवा आर्मीमध्ये अधिकारी असल्याचे सांगून फर्निचर किंवा वाहने कमी दरात देतो” अशी ऑफर देणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे.