( चिपळूण )
तालुक्यातील कान्हे कदमवाडी येथे 35 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (29 मार्च) सकाळी उघडकीस आली. श्वेता राजेश कदम (वय 35, रा. कान्हे कदमवाडी, ता. चिपळूण) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे 8.45 वाजण्यापूर्वी ही घटना घडली. श्वेता कदम यांनी आपल्या घरातील मजघरात आयबीमला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावला. काही वेळाने हा प्रकार घरातील सदस्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांना तातडीने खाली उतरवण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 तसेच आमृ. क्रमांक 07/2026 अन्वये नोंद घेऊन पुढील तपास सुरू आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

