(पुणे/नाशिक)
पुणे-नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या तथाकथित ‘भोंदूबाबा’ अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असताना, आता या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत सवाल उपस्थित केले आहेत.
तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप
तृप्ती देसाई यांनी दावा केला की, नीलम गोऱ्हे या गेल्या अनेक वर्षांपासून अशोक खरात यांना ओळखत होत्या आणि आमदारकी तसेच मंत्रिपदासाठी त्यांनी खरातची भेट घेतली होती. कोरोनापूर्वी त्यांनी खरातकडून भविष्य पाहिल्याचाही आरोप देसाईंनी केला आहे. नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये खरात आणि गोऱ्हे यांची भेट झाल्याचा दावा करत, “महिलांच्या शोषणाच्या इतक्या गंभीर प्रकरणात नीलम गोऱ्हे आतापर्यंत शांत का?” असा सवाल देसाईंनी उपस्थित केला. अनेक महिलांनी पुढे येऊन आरोप केल्यानंतरही गोऱ्हे यांनी भूमिका स्पष्ट केली नाही, असेही त्या म्हणाल्या.
या प्रकरणात पोलिसांकडे 150 हून अधिक व्हिडिओ पुरावे आल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनेही या प्रकरणाची दखल घेत विशेष तपास पथक (SIT) नेमले असून, महिला अधिकाऱ्यांमार्फत तपास सुरू आहे.
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत सर्व आरोप ठामपणे फेटाळले. “गेल्या चार दशकांपासून माझी सामाजिक व राजकीय कारकीर्द पारदर्शक राहिली आहे. कोणत्याही प्रकारच्या बुवाबाजीशी माझा संबंध नाही. मी कोणत्याही ढोंगी गुरूंना भेटत नाही. माझी श्रद्धा केवळ देवदेवतांवर आहे. राजकीय पदासाठी कधीही अशा मार्गाचा अवलंब केलेला नाही, माझे पंढरपूर येथील आजोबा, माझी आई, वडील यांनी माझ्यावर जे संस्कार केले त्याचे मी काटेकोर पालन करत आले आहे, ” असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘षडयंत्र’ असल्याचा आरोप
अशोक खरात यांना भेटल्याच्या बातम्या पूर्णतः खोट्या आणि कपोलकल्पित असल्याचे सांगत, “माझ्या विरोधात काही असंतुष्ट घटकांनी विषारी षडयंत्र रचले आहे,” असा आरोप गोऱ्हे यांनी केला. अधिवेशनादरम्यान या प्रकरणावर भाष्य न करण्यामागे संसदीय नियम कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. “मुख्यमंत्र्यांनी 13 मार्च रोजीच SIT चौकशी जाहीर केली होती. अशावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलणे योग्य नव्हते. मात्र, अधिवेशन संपताच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे,” असे गोऱ्हे म्हणाल्या.
अशोक खरात प्रकरणामुळे आधीच राज्यात खळबळ उडाली असताना, आता या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या प्रकरणातील सत्य समोर येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

