(मुंबई)
आखाती भागात सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता देशांतर्गत बाजारावर दिसू लागला असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे मुंबई पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये खाद्यपदार्थांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरवाढीचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, कामगार आणि दैनंदिन उत्पन्नावर अवलंबून असलेल्या नागरिकांना बसत आहे. गेल्या महिनाभरापासून गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल्स, खानावळी आणि हातगाडी चालकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाईलाजाने खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवाव्या लागत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सामान्य माणसाचा आवडता वडापाव आता 15 रुपयांवरून थेट 25 ते 30 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भजी, उपमा, शिरा यांसारख्या पदार्थांच्या दरातही 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे परवडणारे स्ट्रीट फूडही आता महागाईच्या कचाट्यात सापडले आहे.
मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी राहणारे विद्यार्थी व नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स आणि मेसवर अवलंबून असतात. मात्र, वाढत्या दरांमुळे त्यांचे मासिक बजेट कोलमडले आहे. काही विद्यार्थ्यांना नाश्ता टाळावा लागत असून, दिवसातून एकदाच जेवण करण्याची वेळ आली आहे. अनेकजण इंडक्शनवर मॅगी किंवा साधे अन्न बनवून दिवस काढत आहेत.
व्यावसायिक गॅस सिलिंडरची तीव्र कमतरता जाणवत असून, काळ्या बाजारात एक सिलिंडर 6 ते 7 हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे. घरगुती गॅससाठीही 2 ते 3 हजार रुपये मोजावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. गॅसटंचाईबरोबरच भाजीपाला, खाद्यतेल, डाळी, मसाले यांसारख्या कच्च्या मालाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे छोटे-मोठे हॉटेल चालक आणि हातगाडी व्यावसायिकांना 70 ते 80 टक्क्यांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे.
राज्यातील सुमारे 60 टक्के हॉटेल्स तात्पुरती बंद असल्याची माहिती समोर येत आहे. गॅसअभावी काही विक्रेते पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करत आहेत. मात्र, लाकडांच्या वाढत्या किंमतीमुळे त्यांचाही खर्च वाढला आहे. खाद्यतेलाच्या दरात 30 ते 40 रुपयांची वाढ, तसेच बेसन, बटाटा आणि इतर कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने वडापावसारखा ‘गरीबांचा फास्ट फूड’ही महाग होत चालला आहे. अनेक बेकऱ्या बंद झाल्याने पावाचा पुरवठा कमी झाला असून दर वाढले आहेत.
गॅस टंचाई आणि महागाईचा दुहेरी फटका बसत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. येत्या काळात परिस्थिती सुधारली नाही, तर खाद्यपदार्थांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

