(चिपळूण / प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत पुन्हा एकदा रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न डोके वर काढत आहे. या वसाहतीतील काही उद्योगांनी पावसाचा गैरफायदा घेत नाल्यात सांडपाणी सोडल्याने परिसरातील कोतवली गावातील सोनपात्रा नदी लालसर पाण्याने वाहू लागली. या गंभीर प्रकारानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयाने तत्काळ हालचाल करत आठ उद्योगांवर कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे.
बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसानंतर काही उद्योगांनी रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळाली. पहाटेच्या सुमारास सोनपात्रा नदीचे पाणी लालसर होत असल्याचे दृश्य दिसताच ग्रामस्थांनी तातडीने मंडळाच्या अधिकाऱ्यांना कळविले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नाल्यातील तसेच नदीतील पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवले आहेत. दरम्यान, वारंवार अशा घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून “दोषी उद्योगांवर ठोस कारवाईच हवी,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
सुमारे पंधरवड्यापूर्वी अशाच स्वरूपाच्या घटनेत एका बलाढ्य उद्योगावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. तरीदेखील उद्योगांकडून प्रदूषणाचा खेळ सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या ताज्या घटनेत तब्बल आठ उद्योग जबाबदार धरले असून त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी निखिल घरत यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. आता या उद्योगांविरुद्ध कोणती ठोस कारवाई होते, याकडे परिसरातील ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

