(संगमेश्वर / प्रतिनिधी)
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे भव्य चित्रकला प्रदर्शन २१ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत मुंबईतील द आर्ट एन्ट्रन्स, आर्मी अँड नेव्ही बिल्डिंग फोयर, १४८, महात्मा गांधी रोड, फोर्ट येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून विविध शैलीतील चित्रे आणि शिल्पकृतींचा आस्वाद घेण्याची संधी मुंबईतील कलारसिकांना मिळणार आहे.
सह्याद्री कला महाविद्यालयाचे चेअरमन तथा ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांनी कलाप्रेमींनी या प्रदर्शनास भेट देऊन कलाकारांच्या कलासाधनेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षणमहर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या दूरदृष्टीतून १९९३ साली सावर्डे येथे दृश्यकलेचे शास्त्रोक्त शिक्षण देणाऱ्या सह्याद्री कला महाविद्यालयाची स्थापना झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेल्या या महाविद्यालयाने आज कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य कला शिक्षण संस्थेचा लौकिक मिळवला आहे.
कोकणातील ग्रामीण व वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसह राज्यभरातील अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन चित्रकला, शिल्पकला, अध्यापन, माध्यम क्षेत्र, कला समीक्षण तसेच देश-विदेशातील विविध कला क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक कौशल्यासोबत स्वावलंबनाची जाणीव निर्माण करण्यावरही महाविद्यालयात विशेष भर दिला जातो.
विद्यार्थ्यांना व्यावसायिक कला क्षेत्राची ओळख व्हावी आणि त्यांच्या कलाकृती व्यापक स्तरावर पोहोचाव्यात, या उद्देशाने आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात विष्णू परीट, प्रकाश महिंदकर, रोहन पवार, संदीप ताम्हणकर, बुद्धभूषण सकपाळ, तुळशी भुवड, श्रुती सोमण, सिद्धार्थ भोवड, सौरभ साठे, चिन्मय वडपकर, निशा ओली, मकरंद राणे, ऋतिका शिरकर आणि प्रज्वल घडशी यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रदर्शनासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार शेखर निकम यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रदर्शनात निसर्गचित्रे, सामाजिक जाणिवांवर आधारित कलाकृती, आधुनिक तंत्रकला (आर्ट) तसेच विविध माध्यमांतील चित्रे आणि शिल्पकृतींचा समावेश आहे. रंग, रेषा, आकार, पोत आणि अवकाश यांच्या प्रभावी मांडणीतून कलाकारांच्या भावविश्वाचा अनुभव या प्रदर्शनातून घेता येणार असून, कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

