(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या हायटेक बस स्थानकाचे काम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती ठेकेदार जयेश वाडकर यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सुरू असलेल्या या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत ठेकेदार वाडकर यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे मूळ अंदाजपत्रक २०१६ साली तयार करण्यात आले होते. मात्र कोरोना काळात निधीत कपात झाल्याने सुरुवातीला ५.८५ कोटी रुपयांना मंजुरी असलेले काम आता २.८७ कोटी रुपयांमध्ये पूर्ण केले जात आहे. सध्या काम वेगाने सुरू असून एप्रिल–मे अखेर हे काम पूर्ण करून हायटेक बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षांनी पाहणीदरम्यान शौचालय अंतर्गत भागात घेण्यात आल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच १५ जानेवारीनंतर परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांना या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी घेऊन येण्यात येईल, आणि त्याचवेळी पहिल्या मजल्यावर अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात येईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. पाहणीदरम्यान नगराध्यक्षांनी कामाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच शासन आणि नगर पालिकेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या पाहणीप्रसंगी आगर प्रमुख दीपक चव्हाण, तेजस शिंदे, स्वप्निल भोसले, स्वरूप माने, गौरव उदक, नगरसेवक निहार कोवळे आदी उपस्थित होते.

