(रत्नागिरी)
रत्नागिरीत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील तायक्वॉंदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे याने उल्लेखनीय कामगिरी करत ‘ब्लॅक बेल्ट 1 दान’ परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तसेच तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २९ मार्च २०२६ रोजी ‘ब्लॅक बेल्ट दान प्रमोशन टेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा अखिल भारतीय स्तरावर घेण्यात आली. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडलेल्या या परीक्षेत खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्यासह शारीरिक क्षमतेची कठोर चाचणी घेण्यात आली.
दापोली येथील सिध्दाई तायक्वॉंडो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीचा खेळाडू प्रद्युम्न दाभोळे याने या कठीण परीक्षेत यश संपादन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश दाभोळे आणि महिला प्रमुख प्रशिक्षिका प्रिती दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रद्युम्नच्या या यशाबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम तसेच जिल्हा पदाधिकारी आणि सिध्दाई अकॅडमीच्या सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
प्रद्युम्नच्या या यशामुळे दापोली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

