(कणकवली /रत्नागिरी प्रतिनिधी )
कणकवली तालुक्यातील एका शाळकरी मुलीशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर तिला आपल्या गावी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित दीपक ज्योतीराम माने (रा. लांजा) याच्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी कणकवली पोलिसांनी त्याला हातखंबा येथून मुलीसह ताब्यात घेतले.
४ जुलै रोजी ही मुलगी शाळेत जाते असे सांगून वडिलांचा मोबाईल घेऊन घरातून बाहेर पडली होती. मात्र ती ना शाळेत गेली, ना घरी परतली. त्यामुळे तिला कोणीतरी फूस लावून तिचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी कणकवली पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी तिच्या मोबाईल लोकेशनवरून तिचा माग काढत गुरूवारी तिला संशयित मित्र दिपक माने याच्या घरी हातखंबा गावातील पानवल फाटा येथे ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.
पोक्सोचा गुन्हा दाखल
पोलिसांनी केलेल्या तपासात त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने संशयित दीपक माने याच्याविरुद्ध कणकवली पोलीसांनी बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानूसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी या प्रकरणाची माहिती दिली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.