(रत्नागिरी)
खल्वायन रत्नागिरी या संस्थेची 316 वी मासिक संगीत सभा सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, एस. टी . स्टँड समोर, रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली. सदरहू मैफल मे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड व श्रीमती अनिता आगाशे यांनी प्रायोजित केली होती. कै. अँड. प्रसाद महाजनी स्मृती आणि कै. श्रीधर (बंडा) आगाशे स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजऱ्या झालेल्या या संगीत सभेत किराणा ग्वाल्हेर तसेच जयपूर अत्रोली घराणे गायकीच्या प्रसिद्ध गायिका व गुरू सौ. मधुवंती देव (पुणे) यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच भक्तीगीताच्या सुमधूर सादरीकरणाने सदरहू मैफल रंगतदार झाली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला फिनोलेक्स कंपनीचे अधिकारी श्री. चिवटे व श्री. चिटणीस तसेच श्री. गौरव महाजनी व श्रीमती अनिता आगाशे यांचे हस्ते नटराज पूजन, दीपप्रज्वलन होवून श्रीफळ वाढविले गेले. मैफलीची सुरवात सौ. मधुवंती देव यांनी राग सूरमल्हार मधील विलंबित तीनतालात निबद्ध असलेल्या ‘गरजत आये बादरिया’ या बडा ख्यालाने केली. याला जोडून
मध्यलय तीनताल मधील ‘बरखा रितु बैरी हमारे’ ही बंदिश त्यांनी सादर केली. रागाची आटोपशिर मांडणी, शांत संयमी स्वरांचा उत्तम लगाव आणि घराणेदार गायकीच्या शास्त्रशुद्ध आलाप ताना यामुळे सुरवातीलाच मैफिलीत त्यांनी रंग भरला. त्यानंतर राग बागेश्री मधील रुपक तालातील ‘अब घर आजा’ नंतर खमाज मधील ठुमरी ‘कोयलियाॅं कुक सुनावे’ व शेवटी भैरवीतील ‘अवघा रंग एक झाला’ या अभंगाने त्यांनी मैफलीची सांगता केली.
सदरहू मैफलीस हार्मोनियमची साथसंगत श्री. चैतन्य पटवर्धन व तबल्याची साथसंगत श्री. प्रथमेश शहाणे यांनी उठावदार करून कार्यक्रमात त्यांनी रंगत आणली. तानपुरा व स्वरसाथ मधुवंतीताईंच्या शिष्या तेजस्विनी प्रभुदेसाई व देवयानी केसरकर यांनी केली. मैफल यशस्वितेसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, श्रीमती अनिता आगाशे, डॉ. सौ.तेजस्विनी प्रभुदेसाई, र. ए. सोसायटी, गोदुताई जांभेकर विद्यालय, संजू बर्वे, दिलीप केळकर, पत्रकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

