(मंडणगड)
तालुक्यातील जांभुळनगर येथे विषारी सर्पदंशामुळे जयश्री जितेंद्र बर्जे (वय ३२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी घडली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जयश्री बर्जे या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष असल्याने सकाळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. त्यानंतर त्या नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या. घरापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात काम करत असताना सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास त्यांच्या पायाला विषारी सापाने दंश केल्याचे लक्षात आले.
दंश झाल्याचे कळताच त्या तातडीने घरी धावून गेल्या व कुटुंबीयांना माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
बर्जे कुटुंबावर हा एका महिन्यातील दुसरा मोठा आघात आहे. काही दिवसांपूर्वीच जयश्री बर्जे यांच्या सासऱ्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने जयश्री बर्जे शेतमजूर म्हणून काम करत होत्या, तर त्यांचे पती वाहनचालक म्हणून काम करतात.
त्यांच्या पश्चात पती, सासू, सहा वर्षांचा मुलगा व तिसरीत शिकणारी मुलगी असा परिवार आहे. जयश्री बर्जे यांच्या अकाली निधनामुळे जांभुळनगर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

