(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील राजीवडा पुलाखाली मैत्रीच्या गैरसमजातून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना उघडकीस आली असून, एका २९ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी अरमान नझीर होडेकर (वय २९, रा. राजीवडा पुलाखाली, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार रमजान नवाज मिरकर, साजिद बावा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर (सर्व रा. राजीवडा पुलाखाली, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी, आरोपी आणि साक्षीदार हे सर्वजण एकाच परिसरात वास्तव्यास असून एकमेकांना परिचित आहेत. आरोपी क्रमांक एकाची मैत्रीण अफरीन बली ही जैतापूर येथे राहते. ती फिर्यादीचीही परिचित असल्याने अरमान होडेकर हे तिला भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी अफरीन बली हिने आरोपीचे काही वैयक्तिक सामान गॉगल, चादर आदी फिर्यादीकडे देऊन ते संबंधित आरोपीपर्यंत पोहोचवण्यास सांगितले. अरमानने ते सामान आरोपीकडे दिल्यानंतरही अफरीन बली आणि अरमान होडेकर यांच्यातील संवादाबाबत गैरसमज निर्माण झाला. याच गैरसमजातून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद उद्भवला. त्यानंतर आरोपींनी एकत्र येत शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या पाठीवर, कमरेवर आणि उजव्या पायावर दुखापत झाली.
ही घटना २६ मार्च २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी २७ मार्च रोजी पहाटे ५.४४ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

