(मंडणगड)
मंडणगड तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी आणि समाजाला हादरवून सोडणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्याच नातेवाईकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मंडणगड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक करत जलद कारवाई केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित बालिकेची आई काही कामानिमित्त मंडणगड शहरात आली होती. यावेळी तिच्या सख्ख्या चुलत दिराने खाऊ देण्याच्या बहाण्याने बालिकेला मंडणगड एसटी स्टँड परिसरातून दूर नेले, असा आरोप आहे. बराच वेळ लोटूनही बालिका परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.
दरम्यान, एसटी स्टँडजवळील एका पडिक खोलीत संशयास्पद प्रकार सुरू असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप केला असता आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे समजते. गंभीर अवस्थेत असलेल्या बालिकेला तातडीने आईसह मंडणगड पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या घटनेमुळे सख्या नात्यातील व्यक्तीकडून झालेल्या अमानुष कृत्याने समाजात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू असून, पीडित बालिकेची ओळख गोपनीय ठेवण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि तपासात सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

