(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी शहराजवळील कोकणनगर आणि साळवी स्टॉप परिसरात सध्या रात्रीच्या सुमारास राहणाऱ्या नागरिकांना चक्क ‘गॅस चेंबर’चा अनुभव येत आहे. साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडवरील कचरा रात्रीच्या अंधारात सर्रासपणे पेटवून दिला जात असल्याचे समोर येत असून, यामुळे निर्माण होणाऱ्या धुराच्या प्रचंड लोटामुळे परिसरातील नागरिकांचा श्वास कोंडत आहे. “कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी नागरिकांच्या आरोग्याची विल्हेवाट लावली जात आहे का?” असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
डंपिंग ग्राउंडवर कचरा टाकून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना, तिथे रात्रीच्या वेळी आग लावली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा कचरा नेमका कोण जाळत आहे, हा आता चौकशीचा आणि गूढ विषय बनला आहे. नगर परिषदेचे कर्मचारी स्वतःचे काम सोपे करण्यासाठी हे कृत्य करत आहेत की, रात्रीच्या वेळी तिथे काही समाजकंटकांचा वावर वाढला आहे, याचा छडा लावण्यास प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. रात्रीच्या निरव शांततेत लागणाऱ्या या आगीमुळे निर्माण होणारा धूर संपूर्ण कोकणनगर आणि साळवी स्टॉप परिसरात पसरत आहे.
दररोज रात्री निर्माण होणाऱ्या या धुरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता ही समस्या पूर्णपणे असह्य होत आहे. या धुराचे साम्राज्य इतके भयानक असते की नागरिकांना घरात थांबणेही मुश्कील झाले आहे. धुराच्या वासाने आणि प्रदूषणामुळे अनेकांचे डोळे पाणावत असून, लहान मुले, वृद्ध आणि दम्याच्या रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. आधीच प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या वातावरणात दररोज रात्री होणाऱ्या या प्रकारामुळे स्थानिक जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ मांडला जात असल्याचे बोलले जात आहे. रात्रीच्या वेळी खिडक्या-दरवाजे बंद करूनही हवेत पसरलेला धूर घरात शिरत असल्याने रहिवाशांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.
या गंभीर समस्येकडे रत्नागिरी नगर परिषदेने अक्षम्य दुर्लक्ष केले असून प्रशासन अजूनही ढिम्म अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. डंपिंग ग्राउंडच्या सुरक्षेची आणि देखरेखीची जबाबदारी असलेल्या यंत्रणेला हा दररोज निघणारा धूर दिसत नाही का, असा बोचरा प्रश्न विचारला जात आहे. या डंपिंग ग्राउंडवर कचरा जाळणाऱ्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि येथील धुराचे लोट कायमचे बंद करावेत, अशी तीव्र मागणी कोकणनगरवासीयांनी केली आहे.


