(दापोली)
दापोली येथील “ज्ञानदीप विद्यामंदिर” या शाळेची स्थापना १२ जून २००० रोजी स्व. संतोषभाई मेहता यांनी केली. तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी ज्ञानदीपचे रोपटे रुजविले, जे आज एक भक्कम शैक्षणिक संस्थेत रूपांतरित झाले आहे.
गेल्या दोन दशकांत शाळेने तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, NMMS परीक्षा, इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तसेच एस.एस.सी. परीक्षेत १००% निकाल, तर इयत्ता १२ वी विज्ञान व वाणिज्य शाखेत सातत्याने दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे.
शाळेच्या स्वमालकीच्या इमारतीसाठी संस्थेच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू होते. रौप्य महोत्सवी वर्षात या प्रयत्नांना यश मिळाले असून, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ कार्यालयाशेजारी इमारत व मैदानासाठी महाराष्ट्र शासनाकडून जागा उपलब्ध झाली आहे.
स्व. संतोषभाई मेहता यांचे शाळेच्या इमारतीचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत, नव्या इमारतीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. हा सोहळा संस्थेच्या अध्यक्षा सरोजताई मेहता यांच्या हस्ते पार पडला.
स्व. संतोषभाई मेहता यांचे शाळेच्या इमारतीचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत, नव्या इमारतीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. हा सोहळा संस्थेच्या अध्यक्षा सरोजताई मेहता यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी सेक्रेटरी सुजय मेहता, खजिनदार हसमुख जैन, रवींद्र कालेकर, सुयोग मेहता, देणगीदार सुधीर तलाठी, नगरसेविका साधना बोत्रे, मुख्याध्यापिका रितू मेहता, मुख्याध्यापक मधुकर मोरे, महेश शिंदे, चंदाली पारकर तसेच संस्था पदाधिकारी, विविध समिती सदस्य, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना सुजय मेहता यांनी लवकरच सर्व आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी भव्य इमारत व विस्तीर्ण मैदान उभारण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

