(सातारा / वृत्तसंस्था)
महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या सहा महाविद्यालयीन मित्रांच्या आनंदावर शिरवळजवळ काळाने घाला घातला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास टाटा नेक्सॉन कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार प्रथम दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन समोरून येणाऱ्या आयशर मालट्रकवर आदळली. या भीषण अपघातात कारमधील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेत वेदांत अर्जुन वारिंगे (१९), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९), आदित्य बाळासाहेब गरुड (१९) आणि निखिल बाळू राऊत (२०) या चार तरुणांचा मृत्यू झाला. दीक्षित दयानंद पुजारी (२०) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील हे सहा महाविद्यालयीन विद्यार्थी टाटा नेक्सॉन कारने (MH 14 LJ 3033) पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने निघाले होते. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार शिरवळ हद्दीत आली. यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. त्यानंतर कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या आयशर मालट्रकला (KA 27 C 5878) धडकली.
धडक एवढी भीषण होती की टाटा नेक्सॉन कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलीस, सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच शिरवळ रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकाने कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले.
या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले, तर गंभीर जखमी असलेल्या दीक्षित पुजारी आणि मयूर शिंदे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. पोलिसांनी आणि मदत पथकाने क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच मृत तरुणांचे कुटुंबीय आणि नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. कोवळ्या वयातील मुलांचा मृत्यू झाल्याने मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांपैकी तिघे कुटुंबातील एकुलते एक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, मृत तरुणांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असून शिरवळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, चालकाचा ताबा कशामुळे सुटला आणि या दुर्घटनेमागे अन्य कोणते कारण होते का, याचा तपास शिरवळ पोलीस करत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

