(चिपळूण)
भारताच्या संत परंपरेतील तेजस्वी दीपस्तंभ म्हणून पू. संत श्री रोहिदासजी महाराज ओळखले जातात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते विशेष जाणले जातात, सुधारक संतांमध्ये ते अग्रणी होते. कवी-संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत.
पू. संत श्री रोहिदासजी महाराज यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त चिपळूण येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने त्यांच्या रचना आणि विचारांची सोप्या मराठी भाषेत ओळख करून देणाऱ्या ग्रंथाचे प्रकाशन शनिवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ३ वाजता चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे.
या ग्रंथाचे प्रकाशन प. पू. श्री काडसिद्धेश्वर महाराज यांच्या शुभहस्ते होणार असून, यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात विविध समाजांच्या दिंड्यांनी होणार आहे. या दिंड्या जुना कालभैरव मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरून काढण्यात येतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून संतांच्या प्रतिमा सभागृहात आणण्यात येतील.
सांस्कृतिक कार्यक्रमात चिपळुणातील नामवंत गायक स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर, वरद केळकर तसेच स्टार प्रवाह फेम कु. अनन्या खेराडे हे संत रोहिदास महाराजांच्या रचनांवर आधारित सादरीकरण करणार आहेत. सदर कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून संत परंपरेचा हा अनमोल वारसा अनुभवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

