( रत्नागिरी / वार्ताहर )
पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान झालेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये रत्नागिरीच्या महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तब्बल नऊ पदकांची कमाई केली. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर सौ. गौरी महेश मिलके आणि विशाल कुबल यांची आगामी आशिया चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे तीन खेळाडू सहभागी झाले होते. तिन्ही खेळाडूंनी आपापल्या वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
४० ते ४५ वर्षे वयोगटात सहभागी झालेल्या सौ. गौरी महेश मिलके यांनी तीन पदकांची कमाई केली. त्यांनी ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक, २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये कांस्यपदक आणि २०० मीटर वैयक्तिक मेडलेमध्ये कांस्यपदक पटकावले.
३५ ते ३९ वर्षे वयोगटात विशाल कुबल यांनीही प्रभावी कामगिरी करत तीन पदके मिळवली. त्यांनी १०० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक, २०० मीटर वैयक्तिक मेडलेमध्ये कांस्यपदक आणि ५० मीटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक पटकावले.
३० ते ३४ वर्षे वयोगटात अल्फराज कापडे यांनी तीन रौप्यपदके मिळवत आपली छाप पाडली. त्यांनी १०० मीटर फ्रीस्टाईल, ५० मीटर बटरफ्लाय आणि २०० मीटर फ्रीस्टाईल या तिन्ही प्रकारांत रौप्यपदक पटकावले.
या राज्यस्तरीय स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे सौ. गौरी मिलके आणि विशाल कुबल यांची ३ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत बंगळुरू येथे होणाऱ्या आशिया चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या जलतरण क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
या यशस्वी कामगिरीमागे प्रशिक्षक महेश मिलके यांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंची सातत्यपूर्ण मेहनत महत्त्वाची ठरली. राज्यस्तरीय स्पर्धेत नऊ पदकांची कमाई करत दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवल्याबद्दल रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी, नागरिक आणि जलतरण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

