(रत्नागिरी / प्रतिनिधी)
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६च्या इयत्ता सातवीच्या अंतिम निकालासह गुणवत्ता यादी आज जाहीर झाली असून, खुशी दीक्षा विद्याधर कांबळे हिने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा छाप उमटवली आहे. यापूर्वी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही तिने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे सातवीच्या परीक्षेतील तिचे यश ही तिच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेला मिळालेली आणखी एक पावती ठरली आहे.
खुशी कांबळे हिने याच शाळेतून २०२४ मध्ये झालेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत २३वा क्रमांक, शहरी विभागात नववा क्रमांक आणि शाळेत तिसरा क्रमांक मिळविला होता. त्यानंतरही अभ्यासातील सातत्य कायम ठेवत तिने आता माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. खुशीच्या या यशामागे तिच्या मेहनतीसोबतच तिला सातत्याने मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. माणिक भोये सर, मीना ताडे मॅडम, कौस्तुभ पालकर सर, प्रज्ञा डोंगरे मॅडम, प्रतिभा बंडबे मॅडम, दामले मॅडम, श्रद्धा बोडेकर मॅडम आणि तेंडुलकर मॅडम यांनी तिला परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याच्या क्षमतेला योग्य दिशा देत सातत्यपूर्ण सराव, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांच्या प्रयत्नांनाही या यशाचे श्रेय दिले जात आहे.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्यानंतर सातवीतही यशाची पुनरावृत्ती करणाऱ्या खुशीने आपल्या शैक्षणिक वाटचालीतील सातत्य अधोरेखित केले आहे. तिच्या या कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेलाही नवी ओळख मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांची सांगड महत्त्वाची ठरते. खुशीच्या बाबतीतही या दोन्ही घटकांचा सकारात्मक परिणाम तिच्या कामगिरीतून दिसून आला आहे.
शिक्षकांच्या मेहनतीचेही कौतुक
खुशीच्या यशाबद्दल तिच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशात योगदान देणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक होत आहे. खुशीने मिळविलेले हे यश तिच्या सातत्यपूर्ण अभ्यासाची, जिद्दीची आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची फलश्रुती मानली जात असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

