(दापोली)
दाभोळमधील कुंभारवाडीची कन्या त्रिशा दिनेश दाभोळकर हिने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करत रौप्य (सिल्वर) आणि कांस्य (ब्रॉन्झ) पदक पटकावले आहे. ही स्पर्धा नुकतीच मुंबईतील अंधेरी येथे पार पडली.
त्रिशा ही प्रभास कराटे स्पोर्ट्स अकॅडमीची विद्यार्थीनी असून, सध्या ती मुंबईत वास्तव्यास आहे. विविध राज्यांतील नामवंत खेळाडूंशी दमदार झुंज देत तिने ही पदके मिळवली आहेत. त्रिशाच्या यशामुळे तिच्या कुटुंबासह दाभोळ गावात आणि तिच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याचे स्वप्न
त्रिशाने याआधीही अनेक स्थानिक व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिची जिद्द, मेहनत आणि चिकाटी या प्रवासाचा आधार राहिली आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न असून, तिच्या कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

