(राजापूर / तुषार पाचलकर)
“महाविद्यालयीन जीवन हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारे महत्त्वाचे पर्व आहे. विद्यार्थ्यांनी या काळात मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आई-वडील आणि गुरुजनांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत, जिद्द आणि चिकाटीने वाटचाल करावी. यावर्षी प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी,” असे आवाहन श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी केले.
श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेतील नवागत विद्यार्थ्यांसाठी ‘फ्रेशर पार्टी’ अर्थात नवागत स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. मेश्राम बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन उत्साहात स्वागत केले. नवागत विद्यार्थ्यांनी यावेळी स्वतःची ओळख करून देत महाविद्यालयीन जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात केली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी परिचित करून देतानाच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांशी सुसंवाद वाढवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. निंबाळकर यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नेत्रा बावकर आणि सम्यक जाधव यांनी केले, तर साहिल नार्वेकर यांनी आभार मानले.

