(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
मर्यादित साधनसुविधा, दुर्गम वाडी-वस्त्यांतील प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक आव्हानांवर मात करत जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीच्या कट-ऑफमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यांना मागे टाकले आहे. ग्रामीण भागाचा कट-ऑफ २१२ गुण, तर शहरी विभागाचा कट-ऑफ २०६ गुण राहिला आहे.
कट-ऑफमधील सहा गुणांची ही आघाडी केवळ आकडेवारी नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेचे आणि त्यांच्यासाठी झटणाऱ्या शिक्षकांच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब मानले जात आहे. मर्यादित सुविधा असतानाही गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये असलेली स्पर्धात्मक वृत्ती आणि अभ्यासातील सातत्य या निकालातून अधोरेखित झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आजही दुर्गम वाडी-वस्त्यांमधून शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक साधनांची मर्यादा, प्रवासाच्या अडचणी आणि घरच्या परिस्थितीची जबाबदारी अशा विविध आव्हानांवर मात करत त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली. या यशामागे प्राथमिक शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करण्यासाठी घेतलेले विशेष प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत.
वर्गातील नियमित अध्यापनासोबतच सराव परीक्षा, अतिरिक्त मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणी समजून घेऊन केलेले प्रयत्न यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. ‘परिस्थितीपेक्षा जिद्द मोठी’ हे या यशातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. यंदापासून सुरू झालेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतही प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय राहिले आहे. पहिल्याच वर्षी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी नोंदविलेली ही कामगिरी ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसाठी उत्साहवर्धक मानली जात आहे.
जि. प. शाळांवरील विश्वासाला बळ
मर्यादित साधनसामग्री असतानाही गुणवत्तेच्या जोरावर ग्रामीण विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश जिल्हा परिषद शाळांसाठी सकारात्मक संदेश देणारे ठरले आहे. ‘जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत’ हा विश्वास या निकालामुळे अधिक दृढ झाला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशामुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांमध्येही जिल्हा परिषद शाळांबाबतचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या निकालामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे.
गुणवंत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन
इयत्ता चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या यशामागे उभे राहिलेल्या पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, शिक्षणाधिकारी किरण लोहार तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची ही परंपरा भविष्यातही कायम राहील आणि जिल्हा परिषद शाळांमधून आणखी गुणवंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

