(चिपळूण)
रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा पारंपरिक गोंधळ सोहळा बुधवार, १७ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता मृग नक्षत्रात भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या धार्मिक उत्सवासाठी कोकणासह राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असून टेरव ग्रामस्थांच्या वतीने उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील अनेक कुळांचे कुलदैवत असलेल्या श्री भवानी मातेला सुख, समृद्धी, आरोग्य आणि सौभाग्य प्रदान करणारी देवी मानले जाते. विशेष म्हणजे ९६ कुळांपैकी ७२ कुळांची कुलस्वामिनी म्हणून भवानी मातेची श्रद्धेने पूजा केली जाते. भवानी मातेचा गोंधळ हा पारंपरिक आणि अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी मानला जातो.
या सोहळ्याची सुरुवात देवस्थानच्या पुजाऱ्यांकडून पूजा मांडणी आणि घटस्थापनेने होणार आहे. त्यानंतर मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा केली जाईल. दिवट्या प्रज्वलित करून घटाभोवती प्रदक्षिणा घालत ‘भैरी-भवानीचा गोंधळ मांडीला, गोंधळाला यावे, उदो-उदो-उदो’ असा जयघोष करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, परंपरेनुसार हा गोंधळ व्यावसायिक गोंधळी न घालता टेरव गावातील कदम समाजातील मानकरी सादर करणार आहेत. त्यामुळे या धार्मिक सोहळ्याला स्थानिक परंपरा आणि संस्कृतीची अनोखी जोड लाभणार आहे. यानंतर कुलस्वामिनी भवानी मातेस गाऱ्हाणे घालून मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने देवीचे देणे-मागणे देण्यात येईल. पूजा-अर्चेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी मंदिर परिसराची स्वच्छता करून उद्यापनासह देवीचा अभिषेक करण्यात येणार असून धार्मिक विधीची सांगता होईल. भवानी मातेच्या या मंगलमय उत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि धार्मिक परंपरेचा अनुभव घ्यावा, असे आवाहन टेरव ग्रामस्थांनी केले आहे.

