(चिपळूण/ प्रतिनिधी)
चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याविरोधात मालमत्ता विभागाचे पर्यवेक्षक सागर शेडगे यांनी मुख्यमंत्री स्तरावर तक्रार केल्यानंतर चिपळूण नगर परिषदेत राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बुधवारी नगर परिषदेवर धडक देत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला. शेडगे यांनी केलेले आरोप तातडीने सिद्ध करावेत, अन्यथा शहरातील प्रमुख चौकात जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत पदाधिकाऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली.
काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षांनी केबिनमध्ये बोलावून अपमानास्पद भाषा वापरत धमकी दिल्याचा आरोप करत मालमत्ता पर्यवेक्षक सागर शेडगे यांनी वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या निषेधार्थ शिंदेसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी एकवटले आणि त्यांनी नगर परिषद प्रशासनाला जाब विचारला. मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासमवेत झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक निहार कोवळे, कपील शिर्के, अंकुश आवले, उदय जुवळे, प्रमोद बुरटे, विकी लवेकर, परिमल भोसले तसेच नगरसेविका राणी महाडिक आणि हर्षाली पवार यांनी शेडगे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरातील नागरिकांच्या त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी असल्याचा दावा करत, बदली मिळविण्याच्या हेतूने नगराध्यक्षांवर आरोप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
शेडगे यांच्या कामकाजासंदर्भातील विविध बाबी चौकशी अहवालात समाविष्ट कराव्यात, अशी मागणी करत त्यांनी सध्या मंजूर करण्यात आलेली रजाही रद्द करण्याची मागणी केली. अशा परिस्थितीत त्यांना रजा मंजूर कशी करण्यात आली, असा सवालही त्यांनी प्रशासनाला केला.
नगराध्यक्षांवरील आरोपांमुळे चिपळूण शहराची प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत, आरोप सिद्ध न झाल्यास शेडगे यांनी सार्वजनिकरीत्या नागरिकांची माफी मागावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, नगर परिषद परिसरात शिंदेसेनेच्या समर्थनार्थ आणि शेडगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणामुळे नगर परिषदेत प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

