(पुणे)
पुण्यातील ससाणेनगर परिसरात रामनवमी मिरवणुकीदरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. डीजेच्या अति मोठ्या आवाजामुळे 65 वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृत महिलेचे नाव रंजना रवींद्र जाधव (वय 65) असे असून त्या ससाणेनगर येथील रहिवासी होत्या. गुरुवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिरवणूक पाहताना अचानक प्रकृती बिघडली
ससाणेनगर येथील मुख्य रस्त्यावर राम जन्मोत्सवानिमित्त विविध मंडळांनी एकत्र येत मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत डीजेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या रंजना जाधव यांना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि त्या खाली कोसळल्या. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डीजेच्या तीव्र आवाजामुळे त्यांच्या मदतीसाठी केलेल्या हाका आसपासच्या लोकांना ऐकू गेल्या नाहीत. थोड्यावेळाने काही महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने ऑटो रिक्षातून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वाहतूक कोंडी ठरली जीवघेणी
रामनवमी मिरवणुकीमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मृत महिलेचे पुत्र सौरभ जाधव यांनी डीजेच्या अति आवाजामुळेच आईचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. तसेच घटनास्थळी पोलीस उपस्थित असूनही ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवले गेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर धार्मिक मिरवणुकांमधील ध्वनीप्रदूषण, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रंजना जाधव या लष्कराच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) मधून निवृत्त झालेल्या होत्या.

