(अहिल्यानगर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी–शनी शिंगणापूर रोडवर मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास भीषण रस्ता अपघात झाला. शनी शिंगणापूर येथून दर्शन घेऊन नाशिकच्या घोटी इगतपुरीकडे माघारी जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षाला, शिर्डीहून शिंगणापूरकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षामधील ५ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून टेम्पो ट्रॅव्हलरमधील ९ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात तांबे पेट्रोल पंपाजवळ घडली. धडक इतकी भीषण होती की, रिक्षा चेंडू सारखी हवेत उडाली आणि तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडकेनंतर अनियंत्रित झालेला टेम्पो ट्रॅव्हलरही रस्त्याच्या कडेला पलटी झाला. त्यामुळे ट्रॅव्हलरमधील अनेक भाविक जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. राहुरी येथील पाच रुग्णवाहिका चालकांनी त्वरीत घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी हलवले. सर्व जखमींना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रिक्षामधील काही भाविकांना मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या ९ भाविकांना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्यात आले. या भीषण अपघातात एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिक राजेंद्र वाडेकर यांनी दिली आहे.
दरम्यान, या अपघातामुळे राहुरी–शनी शिंगणापूर रोडवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

