(मुंबई)
मुंबईतील राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. बनावट प्रवेश पास तयार करून ते विकल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, यामध्ये मंत्रालयातील चार कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
मंत्रालय कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींमध्ये दत्तात्रेय केशव गुंजाळ (खाजगी व्यक्ती), शिपाई गणपत जावळे आणि नागेश पाटील, तसेच लिपिक मनोज मोरबले आणि स्वप्निल तायडे यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दोन कर्मचारी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. तपासात उघड झाले की, आरोपींनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि इतर सरकारी विभागांच्या नावाने बनावट लेटरहेड तयार केले. या कागदपत्रांच्या आधारे विधानभवनाच्या सामान्य शाखेकडे अर्ज करून अधिकृत प्रवेश पास मिळवण्यात आले. हे पास पुढे अशा व्यक्तींना विकले गेले, ज्यांचे विधानभवनात कोणतेही अधिकृत काम नव्हते.
2000 ते 5000 रुपयांना विक्री
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रकरण समोर आले. बनावट पास 2000 ते 5000 रुपयांना विकले जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आणि संपूर्ण रॅकेट उघड झाले. मुख्य आरोपी दत्तात्रेय गुंजाळ याने स्वतःच्या पासवर ‘मुख्यमंत्री कार्यालयाचा सल्लागार’ असा खोटा उल्लेख केला होता. पास अधिकृत वाटावा यासाठी त्यावर फोटो आणि मंत्रालयाचा बनावट शिक्का वापरण्यात आला होता.
या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींचे मोबाईल जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहेत. तसेच सुरक्षा तपासणीत नेमकी त्रुटी कुठे झाली, यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. या घोटाळ्यामुळे विधानभवनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या रॅकेटमधील आणखी काही जणांचा सहभाग उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

