(मुंबई)
कोकणातील पावसाळी पर्यटन आणि गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या फेऱ्यांमध्ये मोठा बदल केला आहे. सध्या आठवड्यातून 6 दिवस धावणारी ही लोकप्रिय प्रिमियम ट्रेन आता पावसाळी कालावधीत फक्त 3 दिवसच धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर 15 जून ते 20 ऑक्टोबरदरम्यान लागू होणाऱ्या ‘मान्सून टाइम टेबल’मुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पावसाळी वेळापत्रकामुळे फेऱ्यांमध्ये कपात
कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका आणि कमी दृश्यमानता यामुळे विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. या काळात सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात येतो आणि लोको पायलटनाही विशेष सुरक्षा सूचना दिल्या जातात. याचा परिणाम अतिजलद गाड्यांवर सर्वाधिक होत असून, विलंब टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत या गाडीच्या 100 हून अधिक फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा वंदे भारतचे नवीन वेळापत्रक:
गाडी क्रमांक 22229 (CSMT ते मडगाव)
ही ट्रेन दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार धावेल. मुंबई CSMT वरून पहाटे 5.25 वाजता सुटून दुपारी 4.00 वाजता मडगाव (गोवा) येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 22230 (मडगाव ते CSMT)
ही ट्रेन दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार धावेल. मडगाववरून दुपारी 12.20 वाजता सुटून रात्री 10.30 वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.
वंदे भारतचे तिकीट दर किती?
मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरांबाबत बोलायचे झाल्यास:
- AC Chair Car : 1845 रुपये
- Executive Chair Car : 3390 रुपये
इतर गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल
मान्सून वेळापत्रकामुळे कोकण रेल्वे मार्गावरील इतर अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळा आणि वेगातही बदल करण्यात आले आहेत. जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि वांद्रे-मडगाव एक्सप्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांवर या बदलांचा परिणाम होणार आहे.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी IRCTC किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक तपासूनच तिकीट बुक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

