(नाशिक)
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली अटकेत असलेल्या अशोक खरातनं पोलीस चौकशीदरम्यान केलेले दावे आता चर्चेचा विषय ठरले आहेत.
तो सर्व विधीचाच भाग होता — खरातचा दावा
विशेष तपास पथकाच्या (SIT) ताब्यात असलेल्या अशोक खरातनं चौकशीदरम्यान, महिलांबरोबर केलेली कृत्ये ही धार्मिक विधीचा भाग असल्याचा दावा केला आहे. “मी कोणावरही बळजबरी केली नाही. ज्यांचं भलं केलं तेच आता माझ्यावर उलटले,” असं तो म्हणाल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.
पोलीस कोठडीत मंत्रजप
नाशिक न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेल्या खरातचा सध्या एसआयटीकडून कसून तपास सुरू आहे. कोठडीत असताना तो मंत्रजप करत असल्याचं समोर आलं असून “यापुढे मी मनाचं नाही तर मेंदूचं ऐकेन” असंही त्यानं म्हटल्याची माहिती आहे. त्याच्या या वर्तनामुळे तपास यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
150 हून अधिक महिलांवरील अत्याचाराचा आरोप
या प्रकरणाची व्याप्ती अत्यंत गंभीर असून आतापर्यंत 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही आक्षेपार्ह व्हिडिओही पोलिसांनी जप्त केले आहेत. आतापर्यंत सात महिलांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
शक्तिवर्धक औषधांमुळे प्रकृती बिघडल्याचा संशय
तपासादरम्यान दीड वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उपचारानंतरही त्याच्या एका हाताची हालचाल मर्यादित असल्याचं दिसून येत आहे. तर अनेक महिलांशी लैंगिक संबंध आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशोक खरातची HIV चाचणी केली आहे. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

