(फलटण / सातारा)
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात बुधवारी सकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. खामगाव येथे विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्याने एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलगा आणि मुलगी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. मुलीला वाचवण्यासाठी धावलेल्या कुटुंबीयांनाही विजेचा जबर धक्का बसल्याने संपूर्ण शिंदे कुटुंब काही क्षणांत काळाच्या पडद्याआड गेले. मृतांमध्ये सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (45), गंगुबाई सतीश शिंदे (40), सचिन सतीश शिंदे (26) आणि आरती सतीश शिंदे (24) यांचा समावेश आहे.
पोलीस भरतीचे स्वप्न क्षणात संपले
आरती शिंदे ही पोलीस भरतीची तयारी करत होती. रोजप्रमाणे बुधवारी पहाटे ती धावण्याचा सराव करून घरी परतत होती. त्याचवेळी घरासमोरील महावितरणच्या खांबावरील केबलची सपोर्ट वायर तुटून जमिनीवर पडल्याने त्यामध्ये विद्युत प्रवाह आला होता. अंधारामुळे आरतीचा पाय त्या तारेवर पडला आणि तिला जोरदार विजेचा धक्का बसला.
लेकीला वाचवताना संपूर्ण कुटुंब संपले
आरतीच्या आरडाओरड्यानंतर तिचे वडील सतीश शिंदे, आई गंगुबाई आणि भाऊ सचिन तिला वाचवण्यासाठी धावत बाहेर आले. मात्र, ओलसर जमिनीवर विद्युत प्रवाह पसरल्यामुळे तिघेही त्याच्या विळख्यात अडकले. मात्र, बचाव करण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा धक्का बसल्याने काही क्षणांतच चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने खामगावसह संपूर्ण फलटण तालुका शोकमग्न झाला आहे.
महावितरणच्या तांत्रिक बिघाडाचा संशय
प्राथमिक माहितीनुसार, घरासमोरील विजेच्या खांबावरील केबलच्या सपोर्ट वायरमध्ये विद्युत प्रवाह आल्याने हा अपघात घडल्याचा संशय आहे. नेमके कारण काय, याचा तपास सुरू असून महावितरणच्या यंत्रणेकडूनही चौकशी केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कष्टाळू शिंदे कुटुंबावर काळाचा घाला
शिंदे कुटुंब अत्यंत गरीब असून ऊसतोड मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. आरती खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न उराशी बाळगून पोलीस भरतीसाठी मेहनत घेत होती. मात्र, नियतीने तिच्यासह संपूर्ण कुटुंबावरच घाला घातला. या दुर्घटनेत शिंदे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, कुटुंबातील नातेवाईक आणि गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

