(मुंबई)
राज्यात मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन आणि शासकीय कामकाजात मराठीचा वापर अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील एका वर्षात पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूर या आठ शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्रे उभारण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली.
भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कामकाजात मराठी भाषेच्या वापराबाबत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना सामंत यांनी ही माहिती दिली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लंडनमध्ये उभारणार ‘मराठी भाषा वैश्विक केंद्र’
मराठी भाषेच्या जागतिक प्रसारासाठी राज्य सरकार स्वतंत्र पातळीवर काम करत असल्याचे सामंत यांनी सांगितले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडे पाठविलेल्या प्रस्तावाला पुढील दोन महिन्यांत मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय, लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीची मालकी महाराष्ट्र सरकारने घेतली असून, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ‘मराठी भाषा वैश्विक केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. जगभरातील मराठी भाषिकांना एकत्र जोडणारे हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी साहित्याला मिळणार चालना
मराठी भाषेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध समित्या पुढील तीन महिन्यांत स्थापन केल्या जाणार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेली अनुवाद समिती विविध भारतीय भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल साहित्यिकांना मदत करण्याचे काम करणार आहे.
मराठी फलकांच्या अंमलबजावणीवर भर
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये मराठी फलक, नामफलक आणि सूचना फलकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली जाणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मराठी भाषा अधिकारी नियुक्त करून त्यांना स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. या अधिकाऱ्यांमार्फत मराठी भाषा विषयक समित्यांचे काम अधिक प्रभावीपणे राबवले जाणार आहे.
75 आंतरराष्ट्रीय आणि 75 देशांतर्गत मंच उभारणार
मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी सध्या असलेले 39 आंतरराष्ट्रीय मंच वाढवून 75 करण्यात येणार आहेत. याचबरोबर देशांतर्गत मंचांची संख्याही 75 पर्यंत नेण्यात येणार आहे. एका वर्षात 75 मातृभाषा मंच उभारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केला.

