(चंद्रपूर)
चंद्रपूरमध्ये एका मुलीनं आपल्या प्रेमसंबंधांना विरोध करणाऱ्या वडिलांचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही हत्या तीन वर्षांपूर्वी घडली होती, मात्र आता या प्रकरणाचा मोठा खुलासा झाला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आर्या बाल्लावार हिने तिच्या प्रियकर आशिष शेडमाकेच्या मदतीने वडील जयंत बाल्लावार यांचा खून केल्याचा आरोप आहे. जयंत बाल्लावार हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस ड्युटीवर असताना 25 एप्रिल 2023 रोजी अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूनंतर आर्याला अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात नोकरी मिळाली. सर्व काही सुरळीत सुरू असताना तीन वर्षांनंतर या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले.
वादातून उघड झाला खूनाचा कट
आर्या आणि आशिष यांनी नंतर प्रेमविवाह केला. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. आर्या सासरी जाण्यास तयार नसल्याने मतभेद तीव्र झाले. अखेर संतप्त झालेल्या आशिषने रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण हत्येचा कट उघड केला. या गुन्ह्यात आर्यानं तिचा मावस भाऊ चैतन्य गेडामकडून सुमारे 5 हजार रुपयांना विष खरेदी केल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.
मिल्कशेकमधून दिलं विष
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आर्या आणि आशिष यांच्या प्रेमसंबंधांना जयंत बाल्लावार यांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे दोघांनी मिळून खूनाचा कट रचला. 25 एप्रिल 2023 रोजी ड्युटीवर जाण्यापूर्वी आर्यानं वडिलांना मिल्कशेक दिला, ज्यामध्ये विष मिसळले होते. ते प्यायल्यानंतर काही वेळातच जयंत बाल्लावार यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.
चार आरोपी अटकेत
या प्रकरणात पोलिसांनी आर्या बाल्लावार, आशिष शेडमाके आणि चैतन्य गेडाम यांच्यासह एकूण चार जणांना अटक केली आहे. आरोपींचे व्हॉईस सॅम्पल्स नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
खाकी सेवेची स्वप्नं भंगली
आर्या बाल्लावार हिने नुकतीच 23 मार्च 2026 रोजी पासिंग आऊट परेड पूर्ण केली होती, तर दोन-तीन वादग्रस्त प्रकरणात बडतर्फ असलेला आशिष शेडमाके देखील पुन्हा सेवेत रुजू होण्याच्या तयारीत होता. मात्र या घटनेमुळे दोघांचेही करिअर अडचणीत आले आहे.

