( मुंबई )
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) मंगळवारी आणखी एक मोठा व्यावसायिक करार जाहीर केला. देशातील अग्रगण्य पेंट उत्पादक कंपनी एशियन पेंट्स पुढील तीन वर्षांसाठी भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाची ‘ऑफिशियल कलर पार्टनर’ बनली आहे. या कराराअंतर्गत भारतात होणाऱ्या 110 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एशियन पेंट्सला व्यापक ब्रँडिंग अधिकार मिळणार आहेत.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत BCCI सचिव जय शाह यांचे प्रतिनिधी देवाजित साकीया, तसेच एशियन पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सिंगले यांच्या उपस्थितीत या भागीदारीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
BCCI च्या प्रायोजकांच्या यादीत ‘एशियन पेंट्स’चा प्रवेश
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या BCCI च्या स्पॉन्सर यादीत एशियन पेंट्सचा समावेश Byju’s, Dream11, Tata Sons, Campa, Atomberg, SBI Life यांच्यासोबत झाला आहे. नुकतीच झालेल्या अपोलो टायर्ससोबतच्या जर्सी स्पॉन्सरशिपनंतर हा आणखी एक मोठा करार BCCI च्या उत्पन्नात कोट्यवधी रुपयांची भर घालणार आहे.
सध्या BCCI ला वार्षिक –
- Campa : 48 कोटी
- Atomberg : 41 कोटी
- SBI Life : 47 कोटी
एवढा निधी मिळतो. एशियन पेंट्सच्या कराराची अचूक रक्कम जाहीर केलेली नसली तरी ती याच स्तरावर किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
क्रिकेट आणि रंगांचा अनोखा संगम – अमित सिंगले
या भागीदारीबाबत एशियन पेंट्सचे एमडी आणि सीईओ अमित सिंगले म्हणाले, “क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर 1.4 अब्ज भारतीयांच्या भावना आहेत. रंग म्हणजे ऊर्जा, उत्साह आणि अभिव्यक्ती. एशियन पेंट्सने आठ दशकांपासून घरांना रंग दिले; आता आम्ही क्रिकेटच्या मैदानाला आणि चाहत्यांच्या भावविश्वाला नवा रंग देणार आहोत. ‘ऑफिशियल कलर पार्टनर’ म्हणून आम्ही प्रत्येक क्षण अधिक जिवंत व रोमांचक बनवण्याचा प्रयत्न करू.”
भारतीय क्रिकेटला नवे रंग मिळणार – BCCI
BCCI च्यावतीने बोलताना देवाजित साकीया म्हणाले, “भारतीय क्रिकेटची ऊर्जा आणि एशियन पेंट्सची दीर्घ परंपरा यांचा सुंदर संगम होणार आहे. या भागीदारीमुळे क्रिकेटप्रेमींना एक रंगीबेरंगी आणि अविस्मरणीय अनुभव मिळेल.”
एशियन पेंट्स – भारताचा रंगविश्वातील महाकाय ब्रँड
1942 मध्ये स्थापन झालेली एशियन पेंट्स ही भारतातील सर्वात मोठी व आशियातील दुसऱ्या क्रमांकाची पेंट कंपनी आहे. कंपनीचा वार्षिक महसूल 33,797 कोटी रुपये असून 14 देशांमध्ये उत्पादन केंद्रे व 60 हून अधिक देशांत सेवा जाळे आहे. हा करार केवळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर भारतीय क्रिकेटच्या ब्रँड व्हॅल्यूला अधिक आकर्षक व आधुनिक बनवणारा आहे. रंग आणि क्रिकेट — हे दोन वेगवेगळे जग पुढील तीन वर्षांत एकत्र येऊन चाहत्यांना एक नवा, उत्साहवर्धक अनुभव देणार आहेत.

