(नवी दिल्ली)
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणवरील हल्ल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असली तरी भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा होणार नाही, असा दिलासा केंद्र सरकारने दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 70 डॉलरवरून वाढत 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत, मात्र देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, देशाकडे पुढील दोन महिने पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे आणि तेलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेने कार्यरत आहेत. सोशल मीडियावर इंधन तुटवड्याबाबत फिरणाऱ्या बातम्या अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय देशांतर्गत एलपीजी उत्पादनात सुमारे 40 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
भारताची सुमारे 90 टक्के एलपीजी आयात ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) मार्गे होत असल्यामुळे सरकारने वितरणासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडर वितरणात प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे, तर व्यावसायिक पुरवठ्यात सुरुवातीला कपात करून तो टप्प्याटप्प्याने 70 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. स्थलांतरित कामगारांसाठी 30 हजार लहान (5 किलो) सिलिंडरचे वाटप करण्यात आले असून हॉटेल, रेस्टॉरंट, पोलाद, वस्त्रोद्योग आणि रसायन उद्योगांना प्राधान्याने गॅस पुरवठा केला जात आहे.
दरम्यान, सागरी सुरक्षेबाबतही सरकारने सकारात्मक माहिती दिली आहे. आखाती प्रदेशात भारतीय जहाजे आणि खलाशी पूर्णपणे सुरक्षित असून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. सध्या 20 जहाजांवर कार्यरत असलेले 540 भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. ‘महासंचालक, नौवहन’ Directorate General of Shipping यांचे 24 तास कार्यरत असलेले नियंत्रण कक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमधील बंदरांवर मालवाहतूक सुरळीत सुरू असून कोणताही अडथळा आलेला नाही.
याचदरम्यान, इंधन तुटवड्यामुळे देशात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. कोविड-19 काळातील निर्बंधांसारखी कोणतीही परिस्थिती सध्या निर्माण झालेली नसून देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

