(मुंबई / वृत्तसंस्था)
दिवंगत दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांचे वडील सतीश सालियन यांनी शुक्रवारी (11 सप्टेंबर) बीकेसी येथील सीबीआय कार्यालयात आपला जबाब नोंदवला. त्यांच्यासोबत त्यांचे वकील निलेश ओझा होते. दोघे दुपारी 2 च्या सुमारास सीबीआय कार्यालयात पोहोचले, तर जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सायंकाळी 6.30 च्या सुमारास पूर्ण झाली.
सीबीआय कार्यालयातून बाहेर आल्यानंतर वकील निलेश ओझा यांनी दिशा सालियन यांच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप केले. दिशावर सामूहिक बलात्कार करून त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेत सहभागी असल्याचा संशय असलेल्या सर्व व्यक्तींची नावे सतीश सालियन यांनी सीबीआयकडे दिली असून, या यादीत अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश असल्याचे ओझा यांनी सांगितले. सुरुवातीच्या तपासादरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण सत्य दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूची प्रकरणे थेट संबंधित असल्याचाही निलेश ओझा यांनी दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका माजी पोलीस अधिकाऱ्याची ‘एक्स्ट्रा-ज्युडिशियल कबुली’ (न्यायालयाबाहेरील कबुली) त्यांच्याकडे उपलब्ध आहे. सीबीआयचा तपास पुढे जात असताना त्यातून आणखी तपशील समोर येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सतीश सालियन यांनीही माध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणाशी संबंधित सर्व तक्रारी आणि माहिती सीबीआयकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले. दिशाच्या मृत्यूच्या प्रकरणात ज्यांची भूमिका होती, त्या सर्वांची माहिती तपास यंत्रणेला देण्यात आली असून लवकरच सर्व तपशील सार्वजनिक केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मालाडमधील एका गृहनिर्माण संस्थेच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या तपासानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कोणताही घातपात किंवा कट नसल्याचे सांगत तपास बंद केला होता. मात्र, दिशाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने आता एफआयआर दाखल केला असून दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला आहे.


