(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गुन्हे तपास प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ‘RAIDS App’ विकसित केले असून, या अभिनव उपक्रमामुळे तपास यंत्रणेला अधिक वेग, अचूकता आणि तांत्रिक सक्षमतेची जोड मिळाली आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी कार्यान्वित करण्यात आलेल्या या ॲपचा उपयोग केवळ रत्नागिरीपुरता मर्यादित न राहता राज्यातील इतर जिल्हा पोलीस दलांनाही होत असल्याचे समोर आले आहे.
या अँपची संकल्पना रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली असून, स्थानिक गरजांचा विचार करून ते विशेषतः रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी विकसित करण्यात आले आहे. तपासातील गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रणालीची उभारणी करण्यात आली. ‘RAIDS App’च्या माध्यमातून फरारी आरोपी, पाहिजे असलेले संशयित तसेच हरवलेल्या व्यक्तींची छायाचित्रे तब्बल १०८ विविध तांत्रिक पद्धतींनी पुनर्निर्मित केली जात आहेत. त्यामुळे व्यक्तींची बदललेली रूपरेषा ओळखणे, त्यांचा मागोवा घेणे आणि तपास अधिक परिणामकारकपणे पुढे नेणे पोलीस यंत्रणेला शक्य होत आहे. विशेष म्हणजे, अज्ञात मृतदेहांच्या तपासातही हे ॲप महत्त्वपूर्ण ठरत आहे. चेहरा विद्रूप झालेला अथवा ओळख पटविणे कठीण असलेल्या मृतदेहांचे चेहरे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने पुनर्निर्मित करून त्यांची ओळख पटविण्याच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. त्यामुळे तपासातील अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांना दिशा मिळत आहे.
रत्नागिरीत विकसित झालेल्या या तंत्रज्ञानाचा लाभ आता नागपूर, सातारा, पालघर आणि अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलांनाही होत आहे. अज्ञात मृतदेहांची ओळख, संशयितांचे रेखाचित्र पुनर्निर्माण आणि तपासातील दृश्यात्मक विश्लेषण अशा विविध स्तरांवर या अँपचा यशस्वी वापर करण्यात आला आहे. तंत्रज्ञान आणि तपासकौशल्य यांचा संगम घडवणारे ‘RAIDS App’ हे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे महत्त्वपूर्ण नवोन्मेषी पाऊल मानले जात असून, राज्यातील इतर पोलीस यंत्रणांसाठीही ते मार्गदर्शक ठरत आहे. आधुनिक तपास पद्धतींच्या दिशेने उचललेले हे पाऊल भविष्यात गुन्हे अन्वेषणाची कार्यपद्धती अधिक सक्षम करण्यास उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा देखील आता व्यक्त होत आहे.
पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून तांत्रिक बदल ‘बगाटे पॅटर्न’ म्हणून चर्चेत
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात गेल्या काही काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर हा केवळ प्रशासकीय बदल न राहता कार्यपद्धतीतील ठोस परिवर्तन म्हणून समोर येत आहे. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनातून जिल्ह्यात उभा राहिलेला हा तांत्रिक बदल आता ‘बगाटे पॅटर्न’ म्हणून चर्चेत येऊ लागला आहे. अशा उपक्रमांमुळे पोलीस दलात तंत्रज्ञान स्वीकारण्याची मानसिकता वाढत असून, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात नव्या पद्धतीने काम करण्याचा आत्मविश्वास निर्माण होत आहे. मोठ्या शहरांमध्येच तंत्रज्ञान विकसित होते ही धारणा मोडून जिल्हास्तरावरूनही प्रभावी डिजिटल प्रणाली उभी राहू शकते, हे रत्नागिरी पोलीस दलाने दाखवून दिले आहे. स्थानिक गरजांवर आधारित उपाययोजना हे या मॉडेलचे वैशिष्ट्य ठरत आहे.

