(ठाणे)
कोविडनंतर तब्बल पाच वर्षांनी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या ठाणे महापालिकेच्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला दुर्दैवी गालबोट लागले आहे. ३१ व्या ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत २१ किमी गटात सहभागी झालेल्या देवाती बेन्नी (वय अंदाजे ४५) या स्पर्धकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
देवाती बेन्नी हे ठाण्यातील हॅपी व्हॅली, वसंत विहार परिसरात वास्तव्यास होते आणि खासगी क्षेत्रात नोकरी करत होते. त्यांनी रविवारी २१ किमीच्या पुरुष गटातील मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून ते घरी परतले. मात्र, जेवणानंतर विश्रांती घेत असताना दुपारी सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत मिळवण्याआधीच त्यांचा घरीच मृत्यू झाला.
सदर स्पर्धेसाठी एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले होते. त्यामुळे फिटनेस तपासणी झाल्यानंतरच सहभाग दिला जात होता. तरीही देवाती बेन्नी यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘फिट’ असूनही असा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या २१ किमी स्पर्धेत पुणे येथील एएसआयचे धर्मेंद्र यांनी १ तास ७ मिनिटं ४१ सेकंदात अंतर पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २.९६ लाख रुपयांची रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देखील सहभागी
या मॅरेथॉन स्पर्धेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी झाले होते. त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालय ते पाचपाखाडीतील साईबाबा मंदिरापर्यंतचे अंतर धावत पार केले. खुद्द उपमुख्यमंत्री धावत असल्याचे पाहून स्पर्धकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. त्यांच्या सोबत महापालिका आयुक्त सौरभ राव हे देखील उपस्थित होते.

