(रत्नागिरी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीच्या वतीने आज जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले. मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, तज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विशेषतः हृदयरोग, कॅन्सर आणि मेंदूविकारांसारख्या गंभीर आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत, अशा सुविधा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच गंभीर आजारांच्या निदानासाठी तज्ञ डॉक्टरांची भरती त्वरित करावी, रुग्णालयात जनसंपर्क अधिकारी नेमून स्वतंत्र जनसंपर्क कक्ष सुरू करावा, अशीही मागणी करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य माहिती मिळावी, यासाठी सुसज्ज यंत्रणा उभी करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रुग्णांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाची स्वतःची अँब्युलन्स सेवा नाममात्र दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनात असेही नमूद करण्यात आले की, जिल्हा शासकीय रुग्णालय हे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आरोग्य केंद्र असूनही येथे रुग्णांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसणे, गंभीर आजारांवरील उपचारांसाठी असमर्थता दर्शवणे, रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे पाठवण्याची प्रवृत्ती, तसेच अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधा नसणे, अशा समस्या सातत्याने समोर येत आहेत.
बालरुग्ण विभागात रात्रीच्या वेळी डॉक्टरांची अनुपस्थिती, तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा नसणे, या गंभीर बाबींकडेही लक्ष वेधण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत हे रुग्णालय केवळ प्राथमिक उपचार केंद्र बनल्याची खंत व्यक्त करत, त्यामध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे मनसेने स्पष्ट केले.
दरम्यान, या सर्व बाबींचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहे. यावेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, ॲड. माधवी पालकर, सचिव रोहन शेलार, सर्वेश जाधव यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

