(मुंबई)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (19 नोव्हेंबर) रात्री उशिरा नवी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांची अचानक भेट घेतली. सुमारे ५० मिनिटे चाललेल्या बंद-दरवाजा बैठकीत महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत तणाव, फोडाफोडी आणि वाढते वाद हा प्रमुख मुद्दा होता.
सूत्रांनुसार, शिंदेंनी शाहांकडे थेट नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “विधानसभा निवडणुकीत महायुतीने इतिहास घडवला. त्याच उर्जेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही आपल्याला विजयाची मोठी संधी आहे. पण काही नेते महत्त्वाकांक्षेच्या नादात वातावरण दूषित करत आहेत. यामुळे विरोधकांना आयती संधी मिळते, तसेच या प्रकारामुळे मीडियातही उलटसुलट बातम्या येतात. कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होतोय आणि युतीच्या विजयाच्या मार्गात अनावश्यक अडथळे उभे राहत आहेत.”
शिंदेंनी पुढे शाहांना हेही सूचित केले की, “काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत. असे प्रकार पुढे होऊ नयेत यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. तसेच युतीतील सर्व नेत्यांनी परस्परांवरील टीका टाळून संयम आणि सामंजस्य ठेवले पाहिजे.”
या बैठकीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण याच बैठकीच्या आदल्या दिवशी (18 नोव्हेंबर) पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांनी नाराजी म्हणून अनुपस्थिती दाखवली होती. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन आपला रोष व्यक्त केला.
यावर प्रतिसाद देताना फडणवीसांनी मात्र शिवसेनेलाच सुनावले होते. “फोडाफोडीची सुरुवात तुम्हीच केली, उल्हासनगर आणि कोल्हापूरमध्ये ती तुम्ही केली,” असे तीव्र शब्दात फडणवीस म्हणाले आपला रोष व्यक्त केला होता.
भाजप आणि शिवसेनेतच एकमेकांचे नेते फोडण्याच्या स्पर्धा लागल्यानंतर भाजपने शिंदेंचा मैदान असलेल्या ठाण्यातच जोरदार हादरे दिले. इतर जिल्ह्यातही भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री, नेते यांच्या राजकीय विरोधकांनाच पक्षात घेतले आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली खदखद बाहेर आली. त्यामुळे आपला राग व्यक्त करण्यासाठी मंगळवारी शिंदेंचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गेले नव्हते.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा आणि अमित शाहांशी झालेली मध्यरात्री बैठक राज्यातील महायुतीत सर्वकाही आलबेल नाही, अशा चर्चांना अधिक जोर देणारी ठरली आहे. आता या वादावर अमित शाह मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यातील भाजप नेत्यांना काय मार्गदर्शक सूचना देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तक्रारींचा पाढा वाचणारा मी नाही – एकनाथ शिंदे
या भेटीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे म्हणाले, दिल्लीमधून बिहारला आता मी निघणार आहे. त्यामुळे मी बिहारच्या यशाचे अभिनंदन करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो. चांगली चर्चा झाली. बिहारमध्ये दैैदीप्यमान यश मिळाले आहे. त्यामुळे जाताजाता शुभेच्छा देण्यासाठी शहा यांना भेटलो, असे शिंदे यांनी म्हटले.
महाराष्ट्रात एनडीए आपापसात भांडताना दिसत आहे याची तक्रार करण्यासाठी अमित शहा यांची भेट घेतली का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला असता शिंदे म्हणाले, तक्रारींचा पाढा वाचणारा, रडणारा एकनाथ शिंदे नाही. हा रडणारा नाही लढणारा आहे आणि आपण ते वेळोवेळी पाहिले आहे. या छोट्यामोठ्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो आणि खरे म्हणजे बिहारमध्ये एनडीएमध्ये पाच पक्ष एकत्र होते. त्यामुळे तिथे मोठे यश मिळाले. तसेच बिहारच्या जनतेला पूर्वीचे जंगलराज नको होते, विकास राज पाहिजे होते. महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या निवडणुकीत आपण बघितले की एकजुटीचे बळ काय असते आणि जनतेने महायुतीला यश मिळाले.
शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर तुम्ही अमित शहा यांना भेटला, यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, हे सगळे तुमचे कल्पना विलास आहेत, हे तुम्ही पतंग उडवत असता. आतमध्ये मी बसलो होतो आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत. मी एवढे सांगतो की ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्याचे जे काही प्रश्न आहेत हे राष्ट्रीय पातळीवर आणण्याचा काही विषयच नसतो. त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांसोबत बसलो, चर्चा केली. त्यातून एवढेच ठरले की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, कुठेही मतभेद होणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे हा विषय तिथेच संपला आहे.

