(चिपळूण / प्रतिनिधी)
मुंबई–गोवा महामार्गालगत सावर्डे वहाळफाटा येथे क्षुल्लक कारणावरून गाडी अडवून एका वाहनचालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वॅगनआर कारमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीस रस्त्यातच अडवून गाडीबाहेर खेचत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना २५ डिसेंबरच्या रात्री घडली असून, याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सावर्डे वहाळफाटा येथील ‘तरंग बिअर शॉपी’समोर हा प्रकार घडला. फिर्यादी विनायक अनंत कदम (वय ४४, रा. खांडोत्री देवूळवाडी, ता. चिपळूण) हे मुंबई–गोवा महामार्गावरून आपल्या वॅगनआर कारने गावी जात असताना आरोपींनी दुचाकी अचानक त्यांच्या चालत्या कारसमोर आडवी लावून गाडी थांबवण्यास भाग पाडले.
यानंतर आरोपी जयेश जनार्दन भागडे याने कदम यांना गाडीतून खाली उतरवून शिवीगाळ सुरू केली. त्याचवेळी दुसरा आरोपी किरण जनार्दन भागडे याने फिर्यादींच्या मानेच्या डाव्या बाजूला जोरदार हाताचा फटका मारला. त्यामुळे कदम खाली पडले. या संधीचा फायदा घेत दोन्ही आरोपींनी संगनमत करून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि “तुला जिवे ठार मारू” अशी धमकी दिली.
या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गतही गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जयेश जनार्दन भागडे (वय ३५) व किरण जनार्दन भागडे (वय ३०, दोघे रा. आबिटगाव, दत्तवाडी, ता. चिपळूण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. महामार्गावर अशा प्रकारे घडणाऱ्या गुंडगिरीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या घटनेने परिसरात चर्चा आहे. या प्रकरणाचा सावर्डे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

