(चिपळूण / रत्नागिरी)
चिपळूण तालुक्यातील वहाळ-घडशीवाडी येथे १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. संबंधित मुलाला कथितरीत्या दबाव आणून आणि गावात बदनामी झाल्याने मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करीत तीन जणांविरोधात सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिल सुरेश भागडे (वय १७ वर्षे, रा. घडशीवाडी, ता. चिपळूण) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सृष्टी सुधाकर भागडे (वय २९, रा. वहाळ-घडशीवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पांडुरंग विठ्ठल शेलार (वय ३५), अंजली पांडुरंग शेलार आणि अनिल बळीराम पवार (वय ३८), तिघेही रा. वहाळ-घडशीवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ ते सव्वानऊच्या दरम्यान डॉ. सहस्रबुद्धे यांच्या वहाळ येथील रुग्णालयात संबंधित प्रकार घडल्याचा आरोप आहे. त्यानंतर साहिलने गळफास घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी इन्क्वेस्ट पंचनामा केला असता त्याच्या जीन्स पॅन्टच्या मागील खिशात एक चिठ्ठी आढळून आली.
या चिठ्ठीत संबंधित व्यक्तींविषयी तसेच त्यांच्याकडून झालेल्या कथित दबावाचा उल्लेख असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, एका आरोपीने साहिलला फोन करून बोलावून त्याच्यावर दबाव आणल्याचे तसेच संबंधित प्रकारामुळे गावात आपली बदनामी झाल्याचे साहिलने चिठ्ठीत नमूद केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील तिघांनी संगनमताने साहिलवर दबाव आणून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे सावर्डे पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम १०७ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमागील नेमकी परिस्थिती, चिठ्ठीतील मजकूर आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत सावर्डे पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.


