(देवरूख / सुरेश सप्रे)
रत्नागिरी दक्षिण भाजप महिला मोर्चाचे संघटन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पक्षाच्या उच्च नेतृत्वाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत सौ. रुपाली रुपेश कदम यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रभावी आणि निर्णायक योगदान राहिले आहे. रत्नागिरी दक्षिण भागातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून महिला नेतृत्वाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने त्यांनी सौ. कदम यांच्या नावाला प्राधान्य दिले, ही या नियुक्तीची विशेष बाब मानली जाते.
जिल्हा परिषद निवडणुकीत सौ. रुपाली कदम यांनी अत्यंत अटीतटीची आणि उल्लेखनीय लढत दिली होती. त्यांनी केवळ जोरदार मताधिक्याने स्पर्धा केली नाही, तर महिलांमध्ये, तरुणांमध्ये आणि विविध सामाजिक स्तरांमध्ये सकारात्मक जनसंपर्कही निर्माण केला होता. त्यांच्या लढाऊ वृत्तीची, सातत्यपूर्ण जनसंपर्काची, सामाजिक कार्यातील सक्रिय उपस्थितीची आणि महिला कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
सदर नियुक्ती खासदार नारायण राणे आणि मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर बोलताना सौ. कदम यांनी रत्नागिरी दक्षिण भाजप महिला मोर्चा अधिक गतिमान आणि सर्वसमावेशक करण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण, संघटन विस्तार आणि भाजपची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

