(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यात अपंग व्यक्तींना अपंगत्वाचे दाखले मिळवून देण्याचे आमिष दाखवून काही जणांकडून पैसे उकळल्याची गंभीर चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे. स्वतःला अपंगांसाठी काम करणारी, सरकारी प्रक्रिया सुलभ करून देणारी म्हणून ओळख देणाऱ्या एका महिलेबाबत अनेक अपंग व्यक्तींनी संशय व्यक्त केला आहे.
सदर महिला तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या सभांच्या दिवशी उपस्थित राहत अपंग व्यक्तींशी संवाद साधत होती. अपंगत्वाचे दाखले कसे मिळतात, त्यावर शासनाकडून मिळणाऱ्या पेन्शन व विविध योजनांची माहिती देत तिने संबंधित व्यक्तींचा विश्वास संपादन केल्याचे सांगितले जात आहे.
अपंगत्वाचे दाखले काढण्यासाठी खर्च येतो, सरकारी कार्यालयांचे हेलपाटे टाळता येतील, असे सांगत तिने काही अपंग व्यक्तींकडून दोन ते अडीच हजार रुपये घेतल्याची चर्चा आहे. काहींनी रोख स्वरूपात, तर काहींनी ऑनलाईन माध्यमातून रक्कम दिल्याचे समजते.
मात्र पैसे दिल्यानंतर अनेक दिवस उलटून गेले तरी अपंगत्वाचे दाखले मिळाले नाहीत. सुरुवातीला व्हॉट्सॲपद्वारे “काम प्रक्रियेत आहे”, “आज-उद्या होईल” अशी उत्तरे मिळत होती. मात्र काही दिवसांनी तिच्याकडून असे संदेश येणेही बंद झाले, तसेच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल फोनही बंद येऊ लागल्याने फसवणूक झाल्याची भावना बळावली आहे.
दरम्यान, संबंधित महिलेने काहींना आपण दापोली तालुक्यातील असल्याचे, तर काहींना मंडणगड येथील असल्याचे सांगितल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे तिच्या खरी ओळख काय, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
ही बाब सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरली असून, अनेक अपंग व्यक्तींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काहीजण याबाबत कायदेशीर सल्ला घेण्याच्या विचारात असल्याचेही समजते. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.
दरम्यान, अपंगत्वाचे दाखले मिळवून देतो असे सांगणाऱ्या मध्यस्थांपासून नागरिकांनी सावध राहावे, कोणतीही रक्कम देण्यापूर्वी संबंधित अधिकृत कार्यालयात खातरजमा करावी, असे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत आहे.

