(नाशिक)
नाशिकमधील कथित अंकशास्त्रज्ञ आणि भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वर्तुळात मोठं वादळ निर्माण केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत धक्कादायक दावा करत या प्रकरणाला नवं वळण दिलं आहे. “राज्यातील तब्बल 38 आमदारांनी अघोरी कृत्यांसाठी अशोक खरातकडे जाऊन आपल्या करंगळ्या कापल्या असून, त्याची यादी उपलब्ध आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. या विधानानंतर राज्यातील राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली असून संबंधित आमदार कोण, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
अघोरी कृत्यांचा आरोप, फसवणुकीचे नवे खुलासे
अशोक खरात याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी विविध बनावट प्रकारांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिमोटवर चालणारे नकली साप, वाघाच्या कातडीचा वापर, तसेच चिंचुके पॉलिश करून अंगठीत बसवून लोकांकडून लाखो रुपये उकळल्याचेही समोर आले आहे. तसेच काही मंत्री, अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्ती त्याच्यासमोर नतमस्तक होत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणातील छायाचित्रे आणि पुरावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ, मोठ्या कारवाईची शक्यता
या प्रकरणामुळे अनेक राजकीय नेत्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित 38 आमदारांची नावे समोर आल्यास मोठी राजकीय खळबळ उडण्याची शक्यता आहे. जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई झाली, तर ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील मोठी घटना ठरू शकते. दरम्यान, या प्रकरणाचा फटका महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनाही बसल्याची चर्चा आहे. काही आमदार आणि मंत्र्यांचे खरातसोबतचे फोटो समोर आल्याने तपासाचा वेग वाढला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनावर पुन्हा भर देण्याची मागणी
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नरेंद्र दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारण्यात आला होता. त्यांच्या पश्चातही अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत आहे. मात्र, राज्यात अस्तित्वात असलेल्या अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यभर अंधश्रद्धेविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अधिक बळ द्यावे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

