(माथेरान)
माथेरान घाटमार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी, पिटकर पॉईंट येथे भीषण अपघात घडला. विक्रोळी (मुंबई) येथील पर्यटक आपल्या खाजगी मारुती स्विफ्ट कारने (क्र. MH 05 AJ 8991) माथेरानकडे जात होते. या वेळी समोरून अचानक आलेल्या दुचाकीमुळे कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार यू-व्हळणावरून घसरून थेट खालच्या रस्त्यावर कोसळली.
गाडीमध्ये चालकासह पाच प्रवासी होते. अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना तातडीने नेरळ येथील डॉ. शेवाळे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे अपघात
पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले डांबरीकरण पावसात उखडले असून, रस्त्यावर खड्डे व चर निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना घाट रस्त्यांवर सतत धोका जाणवत आहे. पर्यटक आणि स्थानिकांच्या मते, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे आणि पिटकर पॉईंट परिसर विशेषतः धोकादायक ठरत आहे.
संघटनेचा इशारा
नेरळ टॅक्सी चालक-मालक संघटनेने या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य देखभाल व दुरुस्ती केली नाही, म्हणूनच अपघातांची मालिका सुरू आहे. तातडीने दुरुस्तीचे काम न केल्यास विभागाविरोधात आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संघटनेने दिला आहे.

