(सांगली / वृत्तसंस्था)
मिरज शहरातील गजबजलेल्या गुरुवार पेठेतील शेतकरी चौकात मंगळवारी दुपारी धारदार कोयत्याने वार करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. इलाही लालसाब शेख (वय ५२, रा. डोणगे गल्ली, मिरज) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीवरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना लक्ष्य केले. मानेसह शरीरावर कोयत्याने वार केल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून, भरवस्तीत घडलेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सुतारकाम करणारे इलाही शेख मंगळवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शेतकरी चौकातून जात होते. यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. धारदार कोयत्याने त्यांच्या मानेवर आणि शरीराच्या अन्य भागांवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हत्येसाठी वापरण्यात आलेला कोयताही तेथे आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
दरम्यान, इलाही शेख यांचा शेजाऱ्याशी पूर्वीपासून वाद असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी शेजाऱ्याच्या दारासमोर काढलेल्या रांगोळीवर पाणी टाकल्याच्या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. या वादातूनच पुढे हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रण तसेच अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. शहरातील गजबजलेल्या चौकात भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


