(नवी दिल्ली )
सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर पुन्हा एकदा महागाईचा ताण वाढला आहे. देशातील आघाडीची दुग्ध उत्पादक कंपनी Amul ने दुधाच्या दरात पुन्हा वाढ जाहीर केली असून आज, 14 मेपासून नवीन दर लागू झाले आहेत. कंपनीने दर लिटरमागे 2 रुपयांनी दरवाढ केली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या शक्यतेमुळे आधीच नागरिक चिंतेत असताना दुधाच्या वाढलेल्या किमतींमुळे कुटुंबांच्या मासिक खर्चात आणखी वाढ होणार आहे.
कोणत्या दुधाच्या प्रकारांवर दरवाढ?
अमूलकडून जाहीर करण्यात आलेली दरवाढ प्रमुख दूध उत्पादनांवर लागू होणार आहे. यामध्ये अमूल स्टँडर्ड मिल्क, गोल्ड मिल्क, ताजा, टी-स्पेशल, स्लिम अँड ट्रिम तसेच म्हशीच्या दुधाचा समावेश आहे. कंपनीने यापूर्वी 1 मे 2025 रोजी दुधाच्या किमतीत वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दर वाढवण्यात आले आहेत.
दरवाढीमागे काय कारण?
Gujarat Cooperative Milk Marketing Federation ने दिलेल्या माहितीनुसार, पशुखाद्य, दूध पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती आणि इंधन खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. GCMMF ने निवेदनात म्हटले आहे की, “दूध उत्पादन आणि वाहतूक प्रक्रियेतील एकूण खर्च वाढल्यामुळे ताज्या पिशवीतील दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.” कंपनीच्या माहितीनुसार ही वाढ सुमारे 2.5 ते 3.5 टक्क्यांदरम्यान असून ती सरासरी अन्न महागाई दरापेक्षा कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम
अमूल ही देशातील प्रमुख दूध पुरवठादार कंपनी असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम लाखो ग्राहकांवर होणार आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक बजेटवर यामुळे अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी काळात इंधन दरवाढीची शक्यता व्यक्त होत असल्याने अन्नपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती आणखी वाढू शकतात, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

