(शिर्डी /अहिल्यानगर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीत साईबाबा संस्थानच्या वतीने साजऱ्या होत असलेल्या तीन दिवसीय श्रीरामनवमी उत्सव गुरुवारी मुख्य दिवशी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त हजारो भाविकांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला.
चांदीच्या पाळण्यात बालरामाचा जन्मसोहळा
साईबाबा समाधी शताब्दी मंडपात पारंपरिक पद्धतीने बालरामाचा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. चांदीच्या पाळण्यात बालरामाची मूर्ती ठेवून जय श्रीरामच्या घोषात आणि फुलं-गुलालाच्या उधळणीत वातावरण भारावून गेलं. संपूर्ण शिर्डी परिसर ‘साईराम’ आणि ‘जय श्रीराम’ नामस्मरणाने दुमदुमून गेला.
कीर्तनातून रामायणाचे प्रभावी सादरीकरण
सकाळी 10 ते 12 या वेळेत रामचरित्रावर आधारित कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. रामायणातील विविध प्रसंगांचे प्रभावी वर्णन करण्यात आल्याने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. दुपारी बारा वाजता बालरामाची चांदीची मूर्ती पाळण्यात ठेवून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
साईबाबा आणि प्रभू रामचंद्राचे एकत्र दर्शन
साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सपत्नीक पाळणा हलवत बालरामाच्या जन्माचं स्वागत केलं. त्यानंतर पाळणा साईबाबा समाधी मंदिरात नेण्यात आला. आज श्रीरामनवमी निमित्त साईबाबांच्या समाधीसमोर प्रभू रामचंद्रांची प्रतिमा ठेवण्यात आली असून भाविकांना दोघांचे एकत्र दर्शन घेण्याची संधी मिळत आहे.
115 वर्षांची परंपरा, ऐतिहासिक महत्त्व
साईबाबा संस्थानतर्फे साजरा होणाऱ्या या श्रीरामनवमी उत्सवाला यंदा 115 वर्षे पूर्ण झाली आहेत. या उत्सवाला ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या मोठं महत्त्व आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे.
आज भव्य मिरवणूक आणि सुवर्ण रथ सोहळा
सायंकाळी साईबाबा आणि प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमा सुवर्ण रथात ठेवून शिर्डी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत स्थानिक ग्रामस्थांसह देशभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

