(मुंबई / वृत्तसंस्था)
फटाक्यांच्या दुकानात लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केल्याने झालेल्या स्फोटांमध्ये दुकानाचे छत कोसळून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात सोमवारी (९ नोव्हेंबर) रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. शाहनवाज नियाझ खान असे मृत मुलाचे नाव आहे. आगीमुळे दुकानातील फटाके एकापाठोपाठ फुटू लागले. या स्फोटांच्या तीव्रतेने छताचे स्लॅब कोसळले आणि शाहनवाज ढिगाऱ्याखाली अडकला. बचाव पथकाने त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मालवणीतील अब्दुल हमीद मार्गावरील गेट क्रमांक ८ जवळ तळमजल्यावर असलेल्या दुकानात ही आग लागली. पोलीस आणि बचाव पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९.५६ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली.
मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, दुकानातील सुमारे २० बाय ३० फूट क्षेत्रात आग पसरली होती. या दुकानात मोठ्या प्रमाणात फटाके, विद्युत तारा आणि अन्य साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. आगीच्या ज्वाळा वेगाने पसरत असतानाच फटाक्यांचे स्फोट सुरू झाले. एकापाठोपाठ झालेल्या जोरदार स्फोटांमुळे दुकानाच्या छताचे स्लॅब अचानक कोसळले.
दुकानात एक मुलगा अडकल्याचे समजल्यानंतर बचाव पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केले. ढिगारा हटवल्यानंतर शाहनवाज दुकानाच्या आत गंभीर भाजलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याचे शरीर जवळपास १०० टक्के भाजल्याचे आढळले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुमारे ४० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री १०.३६ वाजता आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या दुर्घटनेत १६ वर्षीय शाहनवाजचा मृत्यू झाल्याने मालवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


